Poetry

Resume
माझ्या
कविता

कविता-रती
वेद सारे, साद सारे, अस्मितेची भावना;
साठलेली अंतरंगी, तूच माझी साधना.

वाट चाले, स्वप्नं सारे, स्वप्नं-लोकाची भरारी,
सावलीही पक्षपाती, तूच माझी सांत्वना.

चंद्र-तारे, विश्व सारे, दाटलेले अंतरी,
अंतरंगी शब्दरूपी, गीत माझ्या जीवना.

घाव सारे, शब्द झाले, शब्द आले बहरूनी,
तूच ती कविता-रती, वेदनेची प्रार्थना-
अंतःरंग
शांत वारा, धुंद सारा
पांगळा वाटे कधी
अंतरीचे गुज माझ्या
वेगळे वाटे कधी

वेदनांचे बंद भारे
वाहले सारे कधी,
भाल-चंद्री रेघ दाटे
"वहिवाट" ती वाटे कधी

दिनदुबळे,रान पिवळे
अग्नीच्या आधीन झाले
शेक तो अन,
ते निखारे
वेगळे वाटे कधी

शब्द सारे, गंध सारे
स्तब्ध झाले ह्या उरी,
जाणिवांचे हे शहारे
वेगळे वाटे कधी …

रात सांडे, संथ तांडे
चालले दैवासवे,
अजुनी भोळा
देव त्याचा
आंधळा वाटे कधी …

दिव्य रात्री, एक पणती
लागली दारापुढे
तीच माझी सूर्यकांती
राउळी वाटे कधी …।
आठवणींची फुले
आठवणींची फुले वेचिता 
अश्रूंची हि धारा गळता,
भावनांच्या पूरात तो 
गतकाळी मज घेऊन गेला!

कठीण कणखर विळखे नसता 
दैवाने मी बंदी जाहलो,
कल्पतरूची पाने झडता
एकाकी मज तो हि गावला.

मी मम जीवनगीत गायता 
सुख- दु:खाची जोड साधता,
शब्द फुटता अंतरातूनी 
रसिक ना मज कोणी मिळाला.

दुनियेची मैफिल रंगता 
भाव अंतरी मनी गोठला,
आज तयाला उण लागता 
पूर तयाचा खूप वाहला...
कंटाळून...
आयुष्याच्या वाटेवर चालतांना,
नसत्या गोष्टींचं ओझं पेलतांना,
जेंव्हा कुणाचे हातपाय बधीर होतात-
तेंव्हा...
कुणीतरी म्हणतो- 
देवा मला क्षणभर विश्रांती दे!
तेंव्हा कुणीतरी,
देवासमोर थकलेले हातपाय टेकवतो 
आणि म्हणतो-
एक काळीभोर रात्र दे!

आजपर्यंत कुणाला दिल्या-घेतल्याचे
हिशेब...
कुणाच्या उपकाराचे ओझे...
कुणाच्या उपकाराचे पडसाद...
शक्य ह्जले तर माझ्याकडेच असू दे!...
पण, देवा!...
मला क्षणभर विश्रांती दे...

नेहमी भंग पडणाऱ्या 
आशांचे गाठोडे...
विश्रांतीसाठी आजपर्यंत मिळालेली
जुनी फाटकी गोधडी 
आणि...
आजपर्यंत-
स्वप्ना म्हणून मिळालेला सुख 
आज स्वप्नात तरी दिसू दे!
हवं तर...
नैवैद्य म्हणून थोडासा प्राण घे!... 
हवं तर थोडीशी लाज विकून 
थोडीशी लाच घे!... 

स्मशानात निपचित पडलेल्या 
थडग्यांचे विचार...
आणि,
त्या विचारांनी माझ्यावर केलेले दुराचार...
दूरवर वसू दे!
कमीतकमी,
माझ्या विचारांना थडगे तरी मिळू दे!
हवं तर माझं स्मरण घे,
हवं तर थोडं विस्मरण दे...

पण, देवा...
येत्या संपूर्ण आयुष्यात 
एकदातरी...
क्षणभर विश्रांती दे!
क्षणभंगुर क्षण.
क्षणभंगुर क्षणांना
मी वेचत वेचत येतो,
कवडसे अन
सोनसडे ते
नयनांनी प्राशून घेतो…

प्रहरी झडे -
प्राजक्त-सडे हे 
गंध दाटुनी गेले,
अजूनही तो गंध अंतरी
मंद मंद साठतो…

गगनात वसे ते
रंगपिसे असे,
क्षणात विरुनी गेले
रिमझिम सरसर
पाऊसधारा-
चिंब चिंब नाहतो…
तू आणि मी...
तू असतांना नुसती 
शब्दांची बरसात व्हायची, 
स्वत: भिजून घ्यायची 
आणि मला हि भिजवायची ... 

लगेच माझ्या मनात 
हिरवळ दूरवर पसरायची 
अन, 
माझा हात हातात घेऊन 
स्वतःला वाहून घ्यायची ... 

तू असतांना माझ्यासाठी 
प्राजक्तफुले घेऊन यायची, 
तो गंध चंद्रपर्यंत जायचा 
मग, रात्रही मोहरून यायची ... 

कधी एकाकी एकटीच 
माझी वाट बघायची, 
माझी आठवण यायची 
अन, डोळ्यातून पझरायची... 

तू असतांना नुसती 
शब्दांची बरसात व्हायची, 
स्वत: भिजून घ्यायची 
आणि मला हि भिजवायची ... 

लगेच माझ्या मनात 
हिरवळ दूरवर पसरायची 
अन, 
माझा हात हातात घेऊन 
स्वतःला वाहून घ्यायची ... 

तू असतांना माझ्यासाठी 
प्राजक्तफुले घेऊन यायची, 
तो गंध चंद्रपर्यंत जायचा 
मग, रात्रही मोहरून यायची ... 

कधी एकाकी एकटीच 
माझी वाट बघायची, 
माझी आठवण यायची 
अन, डोळ्यातून पझरायची...
प्रकाशमान
आकाशात मी एकदा 
तारे म्हणून स्वप्ने रोवली 
काही अंधुक, 
काही लखलखित... 
त्या स्वप्नांनी तिमिरमय आकाश 
अगदी गजबजुन गेलं होतं 
अन चंद्रासारखा मी - 
प्रकाशमान... 
त्या ता-यांच्या भोवताली एकटाच ! 

अगदी अमावस्येच्या रात्री 
संपून गेलो तरी ... 
माझी स्वप्ने टीमटीमणारी, 
लखलखणारी... 
अंधाऱ्या रात्रीतही प्रकाशमान, 
अन तरीही ... 
मी स्वप्नांच्या मधोमध विराजमान... 
थोडा विझलेला, 
थोडा प्रकाशमान... 
तू जवळ असतांना
तू जवळ असतांना 
मला गाणं स्फुरत
गार वाऱ्याची झुळूक यावी...
तसं- 
मन कविमय होतं

तू असतांना नवीन गाणे ..
तू नसता आठव तुझे 
आठवते ते तुझे लाजणे 
अन- 
हृदयाचे हे धगधगणे 

विश्व बदलतं तू असतांना, 
तू असतांना शब्द नवे, 
तू असतांना सप्त-सुरे 
अन - आयुष्याला रंग नवे ... 

तुझ्याच साठी स्वप्नं नवे 
मी पाहीले रोज कधी, 
चोरीले कुणी हृदय कुणाचे? 
कोण कुणाचा अपराधी? 
स्वप्नभंग
बऱ्याचदा मी प्रयत्न केला - 
"बागेत फुले उमलतील" 
रंगीबेरंगी जगात, 
चहूकडे सुगंध पसरेल ... 
आणि 
मी धुंद होऊन सर्व जग विसरेल... 
स्वप्न बघितलं- 
उजाड रानात काहीतरी उगेल? 

चूक झाली- नाही उगणार कदाचित काही? 
स्वप्नात तर सगळं सोपं सोपं होतं... 
प्रत्यक्षात मात्रं, 
उजाड रान खूप मोठं होतं... 
पण, 
माझं स्वप्नं तर त्यामानाने खूप छोटं होतं 
स्वप्नात बघितलेला, 
मखमली फुलांचा, रंगीबेरंगी गालीचा 
वास्तवात मात्रं - 
कधीच पायाखाली येत नाही. 
आणि, 
स्वप्नात घेतलेला, 
धुंद झालेला सुगंध, 
वास्तब्वत कधीच येत नाही... 

वास्तवात मात्रं - 
स्वप्नातली फुले काट्यासारखी टोचतात... 
आणि - 
वास्तवातली माझी स्वप्नं! 
मग 
मृगजळासारखी भासू लागतात... 
म्हणून... 
स्वप्नातून वास्तवात आलेला मी 
मग, 
तुझ्या पायावर डोकं टेकवतो! 
आणि स्वप्नात परत परत डोकावतो! 

0 comments:

Post a Comment

 
Back To Top

Follow Instagram

about me

~Social Me~
PRAVIN KHERODKAR

I specialize in Animation pre-production. I’m passionate about what I do, and I love to help people. Nothing is more fulfilling than being part of a team with similar interests, and an organization that values its employees.

Total Pageviews

Followers